एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप, प्रवाशांचे हाल

भंडारा – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री अचानकच कामबंदचे आंदोलन सुरू केले. यातच राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही एस.टी. संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. रात्री अचानक संप जाहीर केल्यामुळे आज सकाळपासून एसटीची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
पगार वाढीवरुन राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संप घोषित केला. या संपाचा प्रभाव भंडारा, सांगली, गोंदिंयामध्ये सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. रात्रकालीन बसेस सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आगारातून बाहेर जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मंजूर नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा धमक्या देण्यात आल्या असून आम्ही त्या खपवून घेणार नाहीत. तसेच नवीन कर्मचाऱ्यांना आणखी वेतन वाढ द्यावी आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तो पर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटने म्हटले आहे.