एसटीचा प्रवास महागणार

- तब्बल 30 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
मुंबई – इंधनाच्या (डिझेल) वाढत्या किंमती, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती तसेच महामार्गावरील टोल दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता आता ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीचा प्रवास महागणार आहे. कोट्यवधी रूपयांच्या आर्थिक भाराखाली दबलेल्या एसटी प्रशासनाने 30 टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे.
डिझेल दरवाढीमुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार असून तितकीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे. याचबरोबर वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती व महामार्गावरील टोल दरात झालेली वाढ यामुळे तब्बल दोन हजार दोनशे कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला नाईलाजास्तव 30 टक्के भाडेवाढ करणे क्रमप्राप्त झाले आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
त्यानुसार सदर भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. याबाबत अंतिम निर्णय अध्यक्ष घेतील, असे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.