एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांसोबत संवाद साधला. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा 44 वा भाग आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी वीर सावरकर यांचा साहसी क्रांतिकारक असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
अनेक विशेष गुणांचे असे सावरकरजींचे व्यक्तिमत्त्व होते. शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे ते उपासक होते. ब्रिटीश राजवटीविरोधात त्यांनी दिलेल्या संघर्षासाठी ते विशेषतः ओळखले जातात, मात्र याशिवाय ते एक कवी आणि समाजसुधारकदेखील होते. असेदेखील मोदी म्हणाले.
याव्यतिरिक्त संवादामध्ये त्यांनी क्रीडा व आरोग्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले. शिवाय, साहसी गोष्टींच्या कुशीमध्येच विकासाचा जन्म होतो, असेही ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असंही म्हणाले की, ”आपण मानवाच्या विकासाचा प्रवास पाहिला तर कोणत्या-न-कोणत्या साहसी प्रकरांमध्येच प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. विकास हा साहसाच्याच कुशीमध्ये जन्म घेतो”.
यानंतर त्यांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्यांचंही प्रचंड कौतुक केले. गेल्या काही वर्षांपासून लोक एव्हरेस्ट शिखर चढत आहेत. यशस्वीरित्या एव्हरेस्ट चढण्याची मोहीम फत्ते करणाऱ्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व साहसी वीरांचे, विशेषतः मुलींचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.