breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
एलिफंटा बंदरावर २५० व्यावसायिकांच्या पोटावर पाय; पार्थ पवारांकडे रहिवाशांची तक्रार

एलिफंटा, (महाईन्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज (सोमवारी) एलिफंटा बंदराला भेट दिली. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटकांवर अधारित व्यवसायिकांनी त्यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यावर आपल्या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काडण्याचे आश्वासन पार्थ पवार यांनी नागरिक आणि व्यावसायिकांना दिले.
मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या प्रचारात आघाडीवर आहेत. आज त्यानी एलिफंटा बंदराला भेट दिली. त्यांच्यासोबत उरण राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, युवा नेते मंदार पाटील, जईद मुल्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या ठिकाणी पार्थ पवार यांनी सार्वजनिक सुविधांची पहणी केली. येथील नागरिकांचे हाल पाहून पवार यांनी प्रत्येक नागरिकाला विचारपूस केली. त्यावर रूग्णालयाची सुविधा नसल्यामुळे प्रचंड हाल होत असल्याच्या व्यथा नागरिकांनी मांडल्या. गेल्या पाच वर्षात खासदार एकदाही या भागात फिरकला नाही. अंम्ब्युलन्सची सुविधा नाही. महत्वाचे म्हणजे पर्यटनावर अधारीत व्यवसाय करताना प्रशासनाकडून कारवाईचे शस्त्र उगारले जाते. व्यवसाय करताना आमच्या पोटावर पाय दिला जातोय. या प्रशासकीय जाचातून आमची कायमस्वरुपी सुटका करावी, अशी याचना व्यवसायिकांनी पार्थ पवार यांच्याकडे केली.
त्यावर हे सर्व प्रश्न चर्चा करून सोडविले जातील. अँम्बुलन्स उपलब्ध करून अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. स्थानिक भूनिपुत्रांवर पोर्ट डिपार्टमेंटकडून होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून प्रश्न सोडवू. व्यवसायिकांना कायमस्वरूपी परवाने मिळवून दिले जातील. तरूणांच्या नोक-यांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन पवार यांनी रहिवाशांना दिले.

