एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांनी साजरे केले यश

- प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याचा चेहऱ्यावर आनंद : राज्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी गुरुवारी एकत्र येत आपले यश साजरे केले. आयुष्यातील मोठा टप्पा पार करून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रशासकीय सेवेत राहून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
आयोगच्या राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. उपजिल्हाधिकारीपासून कक्षाधिकारी पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांनी युनिक ऍकॅडमीमध्ये एकत्र येत आनंद साजरा केला. यावेळी प्रतिकूल परिस्थिती असताना, त्यावर मात करून स्पर्धा परीक्षेसाठी पुणे गाठले. त्यानंतर सातत्यपूर्ण अभ्यासानंतर यश मिळाल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली.
यशाबाबत कल्पेश जाधव म्हणाला, दोन वर्षापूर्वी मी क्लास वन अधिकारी होईल असे वाटले नव्हते. माझे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. आपल्या कष्टाचे चिज झाल्याचा खूप आनंद आहे. माझ्या आई-वडिलांना तसेच भावाला मी आज सकाळी ही आनंदाची बातमी कळवली. त्यांनाही खूप आनंद झाला आहे. आमचे गाव आदिवासी भागात आहे. आमच्या गावात पदवी शिक्षण पूर्ण केलला मी दुसरा-तिसराच असेल. त्यामुळे आमच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे. कल्पेश आता राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होत आहे.
गडचिरोलीत बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुण्यात आलेला आणि उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होणारा पियुष चिवंडे म्हणाला, माझ्या यशात आई-वडिलांचाही मोठा वाटा आहे. पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला युपीएससीची तयारी करत होतो. परंतु त्यात अपयश आल्यानंतर पूर्णवेळ एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात पाचवा आलेला दत्तू शेवाळे म्हणाला, अभ्यासात सातत्य ठेवल्यास, कठोर परिश्रम घेतल्यास आणि संयम ठेवल्यास यश नक्कीच मिळतं असं वाटतं. दत्तु आता उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहे. तो 2015 पासून या परीक्षेची तयारी करत होता.
यशवंत उमेदवारांचा सत्कार सोहळा
आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेत 212 उमेदवारांनी यश मिळाल्याचे युनिक ऍकॅडमीतर्फे कळविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी पदासाठी 11, पोलीस अधिक्षक 4, सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी 27, मुख्याधिकारी पदासाठी 59, तहसीलदार म्हणून 17 जणांची नियुक्ती झाली आहे. या सर्व यशवंत उमेदवारांचा सत्कार सोहळा बुधवारी (दि.6 जून) सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, असे युनिक ऍकॅडमीने कळविले आहे.