“एमआयएम’मध्ये सामुहिक राजीनामास्त्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन पक्षाच्या शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर शहर कार्यकारिणीची दखल घेतली जात नसून, सहकार्य देखील केले जात नसल्याचे कारण या राजीनामा पत्रात दिले आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी व औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे हे राजीनामे सोपविण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची 2016 मध्ये स्थापन करण्यात आली होती. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे 14 उमेदवार स्वबळावर उभे केले होते. या उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी निवडणुकीची समीकरणे बदलली. या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य यांच्या आश्वासनावर लाखो रुपये खर्च करून 14 फेब्रुवारी 2017 रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची पिंपरीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या समिती सदस्य यांच्या अयोग्य नियोजनामुळे ही सभा होऊ शकली नाही. यामुळे मतदारांचा रोष ओढवून घ्यावा लागला. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसुन आला. मात्र, तरी देखील खचून न जाता पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे पक्षकार्य सुरुच ठेवले.
काही दिवसांपूर्वी वादग्रस्त दर्गा व देहूरोड मुस्लिम जमात दफनभूमीचा वाद निर्माण झाला होता. यामध्ये एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी हस्तक्षेप केला. यामुळे 17 निष्पाप युवकावर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटना नाराज झाले असून आगामी काळात एमआयएम पक्षाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. या सर्व घडामोडींची माहिती प्रदेश प्रभारी आमदार इम्तियाज जलील यांना देत पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या नाराजीतून सामुहिक राजीनामे देण्यात आल्याचे शहर कार्यकारिणीने कळवले आहे.