एनडीए सरकारने शिखांची काळी यादी जवळपास नाहीशी केली

- भाजप नेत्याचा अमेरिकेत दावा
वॉशिंग्टन – मागील 80 व 90 च्या दशकात खलिस्तानी चळवळीला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून अनेक विदेशस्थ शिख नागरीकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या काळ्या यादीतील शिखांना त्यामुळे भारतात येणे मुष्किल झाले होते. पण एनडीए सरकारने ही यादी जवळपास संपुंष्ठात आणली आहे. खलिस्तानी चळवळीशी काही थेट संबंधीत मोजक्याच व्यक्ती वगळता बाकीच्यांची नावे या यादीतून काढून टाकल्याने या शिखांना आता भारतात येऊन अमृतसर येथे दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.
या यादीविषयी विदेशातील शिख नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. ते वातावरण आता यामुळे नाहीसे झाले आहे अशी माहिती भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी आज येथे बोलताना दिली.
भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूचनेनुसार ही काळी यादी तयार करण्यात आली होती व या यादीतील लोकांना भारतीय व्हीसा नाकारण्यात येत होता. पण आता एनडीए सरकारने ही यादीच जवळपास संपुष्ठात आणली आहे असे ते म्हणाले. यादीतील उर्वरीत नावेही लवकरच काढून टाकली जातील अशी माहितीही त्यांनी दिली. राम माधव यांनी सांगितले की 1984 च्या शिख विरोधी दंगलीत तीन हजाराहून अधिक शिखांचे बळी घेण्यात आले. यातील आरोपींना अटकपुर्व जामीन देण्यात आले आहेत. हे जामीन रद्द करावेत अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च
न्यायालयात केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. अमेरिकेतील भारतीय नागरीकांच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतातील सर्व 29 राज्यांमध्ये भाजपची सत्ता यावी असा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही 21 राज्यांमध्ये सत्तेवर आहोत. 22 वे राज्य थोडक्यात आमच्या हातून निसटले असे त्यांनी कर्नाटकच्या बाबतीत बोलताना सांगितले. कॉंग्रेसने त्या राज्यात मागच्या दाराने एन्ट्री केली असल्याची टिपण्णीही त्यांनी केली.