breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

एखाद्याने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?: उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. ‘नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवाल यांच्या सुरक्षेत कोणतीही फट राहता कामा नये. एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?,’ असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हणाले आहेत उद्धव अग्रलेखामधून…

>
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या चार वर्षांत जेवढय़ा ‘थप्पड’, ‘चपला’ खाल्ल्या आहेत तो एक विक्रमच म्हणावा लागेल. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत व लोकशाही मार्गाने ते निवडून आले आहेत. ते कुणाला नको असतील तर त्यांचा पराभव त्याच मार्गाने करावा लागेल. मारहाण करणे हा मार्ग नाही.

>
निवडणूक प्रचारात केजरीवाल एका जीपवरून लोकांना अभिवादन करीत असताना एक तरुण अचानक जीपवर चढला व त्याने मुख्यमंत्र्यांचे मुस्काट फोडले. केजरीवाल यांची प्रकृती मुळातच तोळामासाची आहे. त्यामुळे अशा थपडांनी ते कोलमडून जातात. राजकारणात व एकंदरीत समाजातच असहिष्णुता वाढत आहे व लोक मुद्दय़ांवरून गुद्यांवर येत आहेत.

>
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पंतप्रधान मोदी यांनीही नेमके याच मुद्दय़ांवर बोट ठेवले. मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे असे मोदी म्हणाले. त्या आधी ते एकदा असेही म्हणाले होते की मला खतम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. पंतप्रधानांना असे वाटावे हे काही बरोबर नाही. मोदी यांना उदंड दीर्घायुष्य लाभणार आहे व ते देशाच्या दुश्मनांना पुरून उरतील हे खरे असले तरी राजकीय नेत्यांना जाहीरपणे अपमानित करण्याचे प्रकार थांबायला हवेत.

>
शरद पवार यांच्या बाबतीत हा असलाच घाणेरडा प्रकार दिल्लीत झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

>
अरविंद केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत १२ वेळा असे हल्ले झाले आहेत. कधी अंडे मारले. कधी मिरची पावडर, चपला, शाई फेकली. थपडाही लगावल्या. केजरीवाल हे तिखट बोलतात हे ठीक, पण ते बेलगाम बोलतात. दिल्लीत त्यांच्या ‘आप’ने भाजप तसेच काँग्रेसचा दारुण पराभव केला व सत्तेवर आल्यापासून ते केंद्र सरकार व प्रशासनाशी झगडत आहेत.

>
दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून त्यांना मुख्यमंत्री म्हणून अमर्याद अधिकार हवे आहेत. म्हणजे दिल्लीस स्वतःचे गृहमंत्रालय व पोलीस बळ हवे. ते शक्य नाही. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ते शहर कमालीचे संवेदनशील आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा वगैरे ठीक, पण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राकडे असणे गरजेचे आहे. केजरीवाल यांना ते मान्य नाही व सरकारशी रोज संघर्ष करून ‘थपडा’ खात आहेत.

>
केजरीवाल सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत चांगले काम केले. त्यांनी सरकारी शाळांचा दर्जा सुधारला व मोहल्ला क्लिनिकने गरीबांची सोय केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण त्यांना मधल्या काळात पंतप्रधान पदाचीच स्वप्नं पडू लागली व त्याच भ्रमिष्ठ अवस्थेत केंद्र सरकारवर बेलगाम आरोप सुरू केले.

>
‘आप’तर्फे आतिशी मार्लेना या पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांचा राजकारण्यांवर राग वाढला आहे. लोक नेत्यांना अजून जाहीर थपडा का मारीत नाहीत? याचे आश्चर्य वाटते. केजरीवाल यांना थप्पड का पडली? याचे उत्तर त्यांच्याच नेत्यांनी दिले, पण आम्ही या प्रकाराशी सहमत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button