एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी तीन सराईतांना अटक; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

हिंजवडी: एक कोटी रुपयांचे सोने, हि-यांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे 731 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि रोख 11 लाख रुपये किमतीचे कार असा एकूण 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुस्ताक समशेर खान, राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय 38), इस्माईल बाबू खान (वय 33, दोघे रा. धरमपुरी, जि. धार, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2019 रोजी दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय 24, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तलंगणा) हे भवानी एअर लॉजेस्टीक प्रा.लि. या कुरीयर कंपनीचे सोने, हि-याचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैद्राबाद येथून मुंबई येथे खाजगी प्रवासी लग्झरी बसने घेऊन जात होते. बस सकाळी चहा व नाष्टा करण्यासाठी बेंगलोर-मुंबई महामार्गावर पुनावळे येथील हॉटेल न्यु सागर येथे थांबली. त्यावेळी दीपक सैनी हा फ्रेश होण्यासाठी गाडीतुन खाली उतरला.
त्याने त्याची सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्कीटे, हिरे व रोख रक्कम असलेली बॅग सीटखाली ठेवली. अज्ञात चोरट्यांनी बॅगमधील एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्कीटे, हिरे व रोख रक्कम असलेली पिशवी चोरून नेली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे हे या गुन्हयाचा तपास करीत होते. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस कर्मचारी यांचेसह पुणे मुंबई हायवे लगत असलेल्या हॉटेल परिसरामध्ये असलेले सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता त्यांना गुन्हेगार व्यक्तींची ओळख पटली. सदर व्यक्ती कोण आहेत याचा तपास केला असता सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांना बातमीदारामार्फत सीसीटीव्ही फुटेजमधील निषन्न आरोपी हे मध्यप्रदेश मधील इटावा, देवास येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या एका संयुक्त तपास पथकाने इटावा शहर गाठले. शहरात सलग आठ दिवस सापळा रचुन, वेशांतर करुन मुस्ताक समशेर खान यास शिताफिने ताब्यात घेऊन दाखल गुन्हयामध्ये अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे काबुल केले. सेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची देखील माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे 731 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि रोख 11 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द हैद्राबाद, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस उप निरीक्षक अशोक गवारी, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, संजय गवारे, फारुक मुल्ला, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, किरण आरुटे, प्रवीण दळे, हजरत पठाण, जमीर तांबोळी, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, दत्तात्रय बनसुडे, संपत निकम, धर्मराज आवटे, मंहमद गौस नदाफ, नितीन बहिरट, दादा पवार, धनराज किरनाळे, युनिट एकचे पोलीस कर्मचारी सावन राठोड, सचिन मोरे, राजेंद्र शेटे, महेंद्र तातळे, गणेश मालुसरे, दीपक खरात, प्रमोद हिरळकर तर हिंजवडी पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी कुणाल शिंदे, अमर राणे, सुभाष गुरव, रेखा धोत्रे व विकी कदम नियंत्रण कक्ष येथील महिला पोलीस शिपाई शिवथरे यांच्या पथकाने केली.