एका तासात 60 हजार नागरिकांचा प्रवास -मेट्रो

पिंपरी – वृद्ध नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया, अपंग यांच्यासाठी मेट्रोमध्ये विशेष राखीव व्यवस्था करण्यात येणार आहे. एका डब्यात एका वेळी 300 तर एका तासात 60 हजार नागरिक मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम होईल, अशी माहिती चिंचवड येथे बुधवारी (दि. 6) आयोजित मेट्रो संवाद उपक्रमात देण्यात आली.
पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यासाठी चिंचवड येथील विलो मॅथर प्लॅंट कंपनीत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “मेट्रो संवादा’चे आयोजन करण्यात आले. पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव यांनी संवाद साधला. यावेळी एसकेएफ, थिसन क्रुप, सीआयआय, आयटीआय, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, विलो कंपनीतील अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत लिमये म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात सार्वजनिक वाहतूक सुविधा वाढविणे गरजेचे आहे. दररोज पीएमटी, बीआरटी बसेस बिघाड झाल्याने नागरिकांची वाताहत होते. सुरु आहेत त्यांच्यामध्ये अतोनात गर्दी होत आहे. लोकलच्या मर्यादित फेऱ्या असल्याने लोकलच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सायंकाळी 7 च्या लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसते. अशा वेळी वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांची खूप वाताहत होते. अशा वेळी मेट्रोचा पर्याय अगदी महत्त्वपूर्ण ठरतो.
मेट्रोच्या एका डब्यात एका वेळी 300 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तर एका तासात 60 हजार नागरिक मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या आपोआप घटेल, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी, असुरक्षितता यांपासून नागरिकांना मुक्ती मिळेल. मेट्रोच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सुरक्षा चोवीस तास राहणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद कॅमऱ्यातून होणार आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा बसेल. त्याचबरोबर वृद्ध नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया, अपंग यांच्यासाठी विशेष राखीव व्यवस्था करण्यात येणार आहे असेही लिमये म्हणाले.
रमेश राव म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक सध्या खाजगी वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. वर्तमान स्थितीत केवळ 15 टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करीत आहेत. हा वापर मेट्रोमुळे 80 टक्क्यांवर जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर केल्यास नागरिकांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येईल. वाहनांची गर्दी कमी झाल्यास पर्यावरणीय समस्या कमी होतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या विविध पर्यायांना समाविष्ट करत मेट्रोची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे
ठराविक अंतरावर मेट्रो स्टेशन असल्याने नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. मेट्रो मार्गाव्यतिरिक्त शहराच्या अन्य भागात फिरण्यासाठी मेट्रोच्या वतीने शेअर सायकल, ई-रिक्षा, बस यांसारखे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेट्रो स्थानकांवर 65 टक्के इंधनाची गरज सौरऊर्जेतून पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पर्यावरणपूरक बनणार आहे
विलो मॅथर प्लॉट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे, एच आर हेड सुनील कोदे यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.