एअर इंडियाची सेवा सव्र्हर बिघाडामुळे विस्कळीत

जगभरात प्रवाशांचा खोळंबा; १५५ उड्डाणांस विलंब
एअर इंडियाच्या संगणक आज्ञावलीत (सॉफ्टवेअर) बिघाड झाल्यामुळे हजारो प्रवाशी जगभरात विमानतळांवर खोळंबून राहिले. आज्ञावलीचे काम सुमारे सहा तास बंद राहिल्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. यात एकूण १५५ विमानांच्या उड्डाणास विलंब झाला.
एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, अॅटलांटाच्या सिटा कंपनीचे हे सॉफ्टवेअर असून पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेपर्यंत ते व्यवस्थित काम करीत नव्हते. त्यामुळे विमान प्रवाशांना तिकिटे देता आली नाहीत. हा प्रकार जगातील बहुतांश विमानतळांवर घडला आहे. त्यामुळे अनेक विमान उड्डाणांना विलंब झाला. एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, नंतर आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअरचे काम सुरळित झाले. प्रवाशांची जी गैरसोय झाली त्याबाबत आम्ही दिलगीर आहोत. आज्ञावली पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने नंतर कामे वेगाने होत गेली. दिवसभरातील सर्व विमान उड्डाणांचे सुसूत्रीकरण करण्यात येत असून काही विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. सुमारे दोन तासांचा हा विलंब होता, कारण सकाळी सगळी यंत्रणाच ठप्प झाली होती. सिटा कंपनीचे सॉफ्टवेअर प्रवासी सेवा यंत्रणेसाठी वापरले जात होते. या सॉफ्टवेअरच्या दुरुस्तीचे काम कंपनीने आज सकाळी हाती घेतले होते. त्यानंतरही दोष राहिल्याने यंत्रणा चालू नव्हती. दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांना अडचणी आल्या. सिटा कंपनीने या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आता सेवा पूर्णपणे सुरू झाली असून सर्व विमानतळांवर एअर इंडियाचे काम सुरळित झाले आहे. प्रवाशांनी समाजमाध्यमातून गैरसोयीबाबत राग व्यक्त केला आहे. डॉ. सोनल सक्सेना यांनी सांगितले की, दिल्लीत पहाटे तीन वाजेपासून एअर इंडियाची यंत्रणा बंद पडली, विमानांना विलंब झाला. सिटा कंपनीचा सव्र्हर डाऊन असल्याने ही गैरसोय झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. अशाच तांत्रिक कारणास्तव गेल्यावर्षी २३ जूनला एअर इंडियाची सेवा ठप्प झाली होती.