उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.
उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.
उर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.