पिंपरी-चिंचवडमध्ये श्रीरंग बारणे यांना दुसरा धक्का; आम आदमी पार्टी, मराठा सेवा संघसह ४५ संघटनांचा पार्थ पवार यांना पाठिंबा!

- बारणे आणि मोदी हटावोसाठी कार्यकर्ते मैदानात
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उद्योगनगरीसह मावळातील एकही प्रश्न न सोडविता नुसती छाती ताणून धरणारे विद्यमान खासदार आणि केंद्रातील मोदींना हटविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील आम आदमी पार्टी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वराज अभियान, नागरी सुरक्षा कृती समिती, छावा अशा बलदंड संघटनांनी आज राजकीय मैदानात रणशिंग फुंकले आहे. सामाजिक चळवळीत गेली कित्येक प्रहर कार्यरत असलेल्या एकूण 45 संघटनांनी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना खंबीर पाठिंबा दर्शविला आहे. सामाजिक संघटनांच्या या भूमिकेमुळे अक्षरशा सत्ताधा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचाराचा आश्व पिंपरी-चिंचवडमध्ये चौखोर उधळला आहे. समाजातील विविध घटकांना त्याची एवढी मोहिनी पडली आहे की, विद्यमानांना संपविण्यासाठी पार्थ हाच महाभारतातला अर्जुन बनून आल्याचा भास त्यांना होऊ लागला आहे. त्याचाच प्रत्यय आज पिंपरी-चिंचवडमध्ये आला असून शहरातील एकूण 45 सामाजिक संघटनांनी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. याची घोषणा आज पिंपळे गुरव येथे झाली आहे. बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी महासंघ, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ, आखील मध्यवर्ती गुरव समाज, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, अपना वतन महासंघटना, नाभिक महामंडळ, पथारी हातगाडी कष्टकरी महासंघ, विश्वकल्पना कामगार संघटना, राष्ट्रीय एकता महासंघ, भारतीय मायनॉरिटी सुरक्षा संघ, पिंपरी-चिंचवड शहर लांड्री संघटना, लोकजागर संघटना, जनसंघटना, तक्षशिला बुध्द विहार, जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठान, सीपीआयएम, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, जय बजरंग यंगस्टर, प्रबुध्द भारत महासंघ, पंचशिला मंडळ, वडार सेवा संघ, 1995 पेन्शनार्थी संघटना, ओबीसी संघर्ष समिती, बाळासाहेब जगताप युवा प्रतिष्ठान, नवज्योत प्रतिष्ठान, पुणे कम्प्युटर एज्युकेशन सोसायटी या संघटनांनी पार्थ पवार यांना पाठिंबा दिला आहे.
पार्थ पवार म्हणाले की, या भागातील सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे. आपण चर्चा करून एकेक प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रात प्रयत्न करूयात. तमच्या प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडून सामाजिक घटकातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सत्ताधा-यांनी गेल्या पाच वर्षात नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. तुमची साथ अशीच राहू द्या. केंद्रात ताकद लावून मावळचा परिसर आपल्याला विकसित करायचा आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर यु-टर्न घ्यायला मी दुतोंडी नाही. जे बोलेल ते करून दाखविणारा सच्चा कार्यकर्ता आहे, असा विश्वास पवार यांनी दिला.
मारुती भापकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन काम केले. निवडणुका जवळ आल्यानंतर आमच्यावर आश्नासनांची खैरात केली जाते. सत्ता आल्यानंतर सत्ता भोगणारे नेते आम्हाला वेळ देत नाहीत. आमच्याकडे दुर्लक्ष करतात. या जुन्या आणि त्याच त्या पदाधिका-यांना आम्ही वैतागलो आहोत. आता नवीन व्हिजन म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत. सत्ता आल्यानंतर अनधिकृत बांधकाम, संपूर्ण शास्ती कर माफी, रेडझोन, शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा, एचए कंपनीच्या कामागारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे, असेही भापकर म्हणाले.
मानव कांबळे म्हणाले की, सार्वभौमत्व आणि धर्मनिर्पेक्षतेसाठी संविधान टिकणे गरजेचे आहे. त्यामुळे संविधानाला हात घालणा-या मोदींच्या विरोधात आम्ही वारंवार लढा दिला आहे. मोदींना सत्तेतून हटविण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे. मावळ, पिंपरी-चिंचवड, खालापूर, खोपोली, पनवेल भागातून तुम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यासाठी गावोगावी कोपरा सभा, बैठका, संवाद सभा घेवून रात्रीचा दिवस करणार, असा विश्वास कांबळे यांनी पार्थ पवार यांना दिला.
शेकडो माथाडी कामगारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
यावेळी भारतीय माथाडी कामगार संघटनेचे पुणे जिल्हा सचिव रवी भिलारे यांनी शेकडो युवकांसह पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी शेकापचे नितीन बनसोडे, उपाध्यक्ष भालचंद्र फुगे, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतिश काळे, छावा संगटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आदींसह शेकडो कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि पार्थ पवार यांना पाठिंबा मिळत असल्याने आज उद्योगनगरी राष्ट्रवादीमय झाली आहे. पार्थ पवार यांचा विजय पक्का… राष्ट्रवादी पुन्हा… पार्थ पवार आगे बढो… हम तुम्हारे साथ है… कोण आला रे कोण आला… अशा गगणभेदी घोषणांनी पार्थ पवार यांचा विजय पक्का असल्याची साद घातली आहे.