उद्यापासून सुरु होतोय ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’

मराठी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणारा आणि लोकमान्यता मिळवणाऱ्या ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ला उद्यापासून (शुक्रवार, ८ जून) सुरुवात होत आहे. १० जूनपर्यंत हा महोत्सव भरवण्यात येणार आहे. पणजीतील गोवा कला अकादमी, मॅकेनिज पॅलेस, आयनॉक्स आणि १९३० (वास्को) या सिनेगृहांमध्ये हा महोत्सव असणार आहेत.
राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, खासदार संजय राऊत, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची खास उपस्थिती असेल. उद्घाटनानंतर विविध मनोरंजक कार्यक्रम सादर होतील. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या ‘वर्ल्ड प्रिमिअर’ने महोत्सवाची सुरुवात होईल.
यावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्दर्शक गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्दर्शक धोंडिबा कारंडे), इडक (दिपक गावडे), सत्यजित रे: लाइफ अॅण्ड वर्क (दिग्दर्शक विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्दर्शक सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्दर्शक रवी जाधव), बबन (दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे), आम्ही दोघी (दिग्दर्शिका प्रतिमा जोशी), झिपर्या (केदार वैद्य), कच्चा लिंबू (प्रसाद ओक), लेथ जोशी (महेश जोशी), रणांगण (राकेश सारंग), बकेट लिस्ट (तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (सागर वंजारी), व्हॉटस्अप लग्न (विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (मिरांशा नाईक) या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम निर्मित आणि स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या जागतिक प्रिमिअरने महोत्सवाचा समारोप होणार आहे.