उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

लखनौ – प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला होता. या प्रकरणात शर्मा यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. कारण बिहारच्या सितामणी येथे शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सितामणी येथील एक स्थानीक वकिल ठाकुर चंदन सिंह यांनी शनिवारी सकाळी शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिनेश शर्मा यांच्या विधानामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आयपीसी कलम 295 (अ) आणि 120 (ब) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना, रामायण काळामध्ये सीता या जमिनीतून बाहेर आल्या होत्या. म्हणजेच त्यावेळी असलेली टेक्नॉलॉजी ही टेस्ट ट्यूब बेबी प्रमाणे होती. म्हणजे सीता यांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमधून झाला, असे शर्मा म्हणाले होते.
दरम्यान, भाजपाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी देखील एप्रिलमध्ये एक जावईशोध लावला होता. महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे, असे देब यांनी म्हटले होते.