उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळाचे 26 बळी

- दिल्लीलाही आज वादळाचा फटका
27 विमानांचे मार्ग बदलले
अन्य राज्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता - महाराष्ट्रात पावसाचे दोन बळी
नवी दिल्ली – आज दिवसभरात पावसाशी संबंधित घटनांमध्ये महाराष्ट्रात दोघाजणांचा मृत्यू झाला. काल उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळामुळे 26 जण मरण पावले, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. धुळीचे वादळ आणि वीजा पडण्याच्या घटनांमुळे उत्तर प्रदेशातील 11 ठिकाणी हे मृत्यू झाले. जौनपूर आणि सुल्तानपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 5, उन्नावमध्ये 4, चांदोली आणि बहारीचमध्ये प्रत्येकी 3, रायबरेलीमध्ये 2 आणि मिर्झापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला.
तर दिल्ली आणि परिसराला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे दिल्लीकर भाजून निघत होते. त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थोडा दिलासा मिळाला. दिल्लीतील धुळीचे वादळ आता आझियाबाद, मीरत, बाघपत आणि उत्तर प्रदेशातील जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये घोंघावण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 80 किमी वेगाने वारे वाहिले आणि या धुळीच्या वादळामुळे आज दिवसभरात 27 विमानांचे मार्ग बदलावे लागले. हरियाणा आणि पंजाबमध्ये तापमान कमी झाले आहे.
मुंबईत आज पावसाची दमदार हजेरी लागली. त्यामुळे उपनगरी रेल्वे वाहतुकीवर थोडा परिणाम झाला. उष्णतेची लाट असलेल्या पंजाब, हरियाण आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागातही पावसाचे वृत्त आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रद्श, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, असाम, मेघालय, बिहार, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात सकाळी वीज अंगावर पडल्याने स्टेनी अदमानी हे मच्छिमार मरण पावले, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शिवाजी पाटील यांनी सांगितले. यावेळी अन्य सहा जण वीजेमुळे जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसामुळे मुंबईत झालेल्या अपघातात एक दुचाकी चालक महिला मरण पावली. मुंबईत मध्यरेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्या उशीराने धावत होता. तर खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग बदलण्यात आले.