उत्तर कोरियाचा वरीष्ठ लष्करी अधिकारी अमेरिकेकडे

चर्चा प्रक्रियेची पुढील टप्पा सुरू
सेऊल – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यातील चर्चेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून उत्तर कोरियाचा एक वरीष्ठ लष्करी अधिकारी अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेत दाखल होत आहे. त्याच्या भेटीत ट्रम्प आणि जोंग यांच्यातील चर्चेचा तपशील निश्चीत केला जाईल असे सांगण्यात येते. जनरल किम योगं चोल असे या उत्तर कोरियायी लष्करी अधिकाऱ्याचे नाव असून तो बिजींग मार्गे अमेरिकेला रवाना होत आहे.
ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात 12 जूनला सिंगापुरला होणाऱ्या बैठकीसाठी डिप्लोमॅटिक चॅनेलच्या हालचाली सध्या जोरात सुरू आहेत. या चर्चेच्या तयारीसाठी व्हाईट हाऊसचे एक शिष्टमंडळही लवकरच सिंगापुरला जात आहे. तेथील भेटीचे ठिकाण ठरवणे आणि सुरक्षा व्यवस्था निश्चीत करण्याचे काम हे शिष्टमंडळ करणार आहे.
या निमीत्ताने अठरा वर्षात प्रथमच उत्तर कोरियाचा अधिकारी अमेरिकेच्या भूमीवर उतरणार आहे. या आधी सन 2000 मध्ये उत्तर कोरियाचे व्हाईस मार्शल जो म्योंग रोक हे तत्कालिन अध्यक्ष बिल क्लिंटन यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते.