Mahaenews

उत्तम सिबिल स्कोअर असलेल्यांसाठी खुशखबर…

Share On

मोठे गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना घटलेल्या व्याजदराचा लाभ मिळणार 
मुंबई – बॅंक ऑफ इंडियाने (बीओआय) चांगला सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना 30 लाख रुपये वा त्याहून अधिक रकमेच्या गृहकर्जावर विशेष व्याजदर देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार, 760 व त्याहून अधिक स्कोअर असलेल्या ग्राहकांना बॅंक मिनिमम होम लोन इंटरेस्ट रेटनुसार (एमसीएलआर) व्याजदर आकारणार आहे. एमसीएलआर म्हणजे किमान व्याजदर, ज्यापेक्षा कमी दराने बॅंक कर्जे देऊ शकत नाही.

ग्राहकाचा सिबिल स्कोअर म्हणजे क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्टचा (सीआयआर) 3 आकडी सारांश असतो – त्यामध्ये पूर्वीचे क्रेडिटविषयक वर्तन व परतफेडीची पार्श्वभूमी यांचा सारांश असतो – आणि ही आकडेवारी 300 ते 900 या दरम्यान असते. हा स्कोअर जितका अधिक असतो तितकी कर्ज मंजूर होण्याची शक्‍यता अधिक असते. बहुतेक अशा बॅंका कर्ज मंजूर करण्यापूर्वी ग्राहकाचा सिबिल स्कोअर व रिपोर्ट तपासतात.

बॅंक ऑफ इंडियाने नमूद केले, आम्ही ग्राहकांना दर्जेदार व नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो व त्यामुळे ग्राहकांना गरज असेल तेव्हा कर्जसुविधा मिळण्यासाठी मदत होते. चांगला क्रेडिट स्कोअर राखण्याची शिस्त पाळणाऱ्या ग्राहकांना बक्षीस द्यायला हवे. यामुळे आर्थिक पार्श्‍वभूमी चांगली राखण्याची गरज व महत्त्व यामुळे अधोरेखित होईल. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या गृहकर्ज अर्जदारांना चांगला व्याजदर देऊन बक्षीस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे व यामुळे त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.

बॅंक ऑफ इंडियाचा 30 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या गृहकर्जासाठी सिबिल स्कोअर 759 असल्यास वर्षासाठी एमसीएलआर अधिक 0.10 टक्‍के व्याजदर आकारणार आहे. सिबिलचे डायरेक्‍ट टू कन्झ्युमर्स इंटरॅक्‍टिव्ह विभागाचे प्रमुख हृषिकेश मेहता यांनी सांगितले, बॅंक ऑफ इंडियाच्या सिबिल स्कोअरवर आधारित उपक्रमामुळे कर्जविषयक चांगल्या सवयी रुजवून उत्तम क्रेडिट प्रोफाइल तयार करण्याची व त्याची पाहणी करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी मदत होईल. यासाठी बॅंक ऑफ इंडियाशी सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे सिबीलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version