उज्ज्वला योजनेने सामाजिक बदल झाला – मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली – गरीब घरातील महिलांना गॅस कनेक्शन देणाऱ्या उज्ज्वला योजनेमुळे देशात मोठा सामाजिक बदल झाला आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत एकूण चार कोटी घरांत गॅस कनेक्शन देण्यात आले असून त्यातील 45 ट्क्के लाभार्थी हे दलित आणि अदिवासी आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांशी आज मोदींनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आपल्या कारकिर्दीत दलित आणि अदिवासींना मोठा लाभ झाल्याचा दावाही त्यांनी केला.
या संबंधातील आकडेवारीही त्यांनी सादर केली. ते म्हणाले की सन 2010 ते 2014 या काळात म्हणजेच कॉंग्रेसच्या मागच्या चार वर्षाच्या काळात 445 दलितांना पेट्रोल पंप मिळाले पण आपल्या 2014-18 या चार वर्षाच्या काळात 1200 दलितांना पेट्रोल पंप देण्यात आले असे त्यांनी नमूद केले. त्याच प्रमाणे आपल्या काळात दलितांना एकूण 1300 गॅस एजन्सीज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की देशात सन 2014 पर्यंत एकूण 13 कोटी कुटुंबाना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले होते. पण गेल्या चार वर्षात गॅस धारकांची संख्या 10 कोटींनी वाढली आहे.
देशातल्या 70 टक्के गावांमध्ये शंभर टक्के गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. एलपीजीच्या प्रसाराने लोकांना स्वच्छ इंधनाचा मार्ग उपलब्ध झाला असून त्यातून मोठा सामाजिक बदल घडल्याचे त्यांनी सांगितले. उज्जवला योजनेचा लाभ मुस्लिम कुटुंबानाही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.