इसिसच्या क्रौर्याचा नवा नमुना – मानवी बॉंब बनवून कैद्याची हत्या
मोसूल (इराक) – सीरिया आणि इराकमधून माघार घ्यावी लागलेल्या इसिसने आपली दहशत कायम ठेवण्यासाठी क्रौर्याचे नवनवीन प्रकार शोधले आहेत. त्याचे फोटो/व्हिडियो जारी करणे चालू ठेवले आहे. त्यांचे एक नवीन रूप जाहीर झाले आहे. मोसूलमध्ये एका कैद्याला इसिसने मानवी बॉंब करून एका इमारतीवरून खाली फेकून दिले आहे आणि त्याचे फोटो/ व्हिडियो प्रसिद्ध केले आहेत. मिळालेल्या फोटोंमध्ये इसिस दहशतवादी कैद्याला लाकडाच्या पट्ट्या बांधताना दिसत आहेत. त्याची मान हालू नये अशा पद्धतीने त्याला बांधले आहे. त्याच्या डोक्यावर स्फोटके भरलेले हेल्मेट घातले असून त्यावर एक ट्रिगर फिट केला आहे.
या मानवी बॉंबला त्यांनी एका इमारतीवरून खाली डोके वर पाय अशा अवस्थेत फेकून दिले खाली आदळताच स्फोटकांचा स्फोट झाला आणि त्याचे मस्तक धडावेगळे झाले.
ही कारवाई म्हणजे सीरियन आणि रशियन लष्कराच्या हवाई हल्ल्यांच्या कारवाईवरची प्रतिक्रिया होती, की त्या कैद्याचा काही अपराध होता हे समजू शकले नाही. इराक आणि सीरियामधून हकालपट्टी झालेल्या इसिसच्या ताब्यातील यॉर्मॉक जिल्हा हे अखेरचे ठिकाण आहे.