इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कथित अपयशाचा अंदाज अतिशयोक्तीपूर्ण

- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टिकरण
नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटमधील मोठ्या प्रमाणावरील कथित अपयश आणि मतदानातील व्यत्ययाबाबत आलेले वृत्त म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण अंदाज असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
लोकसभा किंवा राज्य विधानसभांच्या सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग पुरेशा प्रमाणात राखीव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट वाटप करत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानाच्या दिवशी मतदान आणि व्हीव्हीपॅट यांच्यात बिघाड झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिघाड झालेल्या यंत्रांच्या जागी 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत नवी यंत्र पुरवली जातात, असेही आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्रातल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातल्या 35 मतदान केंद्रांवरील मतदान रद्द झाल्याच्या काही वृत्त वाहिन्यांवरील बातम्या तथ्यांवर आधारीत नसल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या मतदार संघातील कुठल्याही मतदान केंद्रावरील मतदान रद्द करण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत सुरू आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.