इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटांची गुंतवणूक

नवी दिल्ली – पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने टाटा सन्स कंपनीचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी ओलाच्या इलेक्ट्रिक वाहनांना साथ देण्याचे ठरवले आहे. ऍपच्या आधारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला या कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक करत इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात पाऊल ठेवले आहे. ओलाने 2021पर्यंत रस्त्यांवर एक दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ओला कंपनीने या वर्षी मार्च महिन्यात टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया या कंपन्यांच्या साथीने 400 कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. रतन टाटा यांनी यापूर्वी ओला कंपनीचाच एक भाग असलेल्या एएनआय टेक्नॉलॉजी या कंपनीतही जुलै 2015मध्ये प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. यामुळे ओलाला मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक मोबॅलिटी सुविधा देता येणे शक्य होणार आहे, असे ओलाचे सहसंस्थापक आणि सीईओ भावेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले. या कंपनीने चार्जिंग सोल्युशन्स, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले स्थान बळकट केले आहे.
इलेक्ट्रिक वाहने दिवसेंदिवस विकसित होत आहेत. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी वाहनांच्या उन्नतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल याची मला खात्री आहे. मी भावेश अग्रवाल यांच्या दृष्टिकोनाची नेहमीच प्रशंसा केली आहे, टाटा यांनी म्हटले आहे.