इचलकरंजीला वारणा पाणी योजनेतून पाणी मिळणार – चंद्रकांत पाटील

मुंबई : वारणा पाणीपुरवठा योजनेसंबंधी इचलकरंजी शहर वारणा पाणीपुरवठा योजना आणि विरोधी कृती समितीची संयुक्त बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीत इचलकरंजीसाठी वारणा योजनेतून पाणी देण्याचा तोडगा सर्वानुमते काढण्यात आला. तसेच पाणी वाटपाच्या संघर्षातून दानोळीतील ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली.
दानोळी जवळच्या कृष्णा-वारणा नदी संगमातून इचलकरंजीला पाणी देण्याचा तोडगा सर्वानुमते काढण्यात आला. यासाठी पाटबंधारे विभागाच्या समितीकडून फेर सर्वेक्षण करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच, इचलकरंजीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील गळती दुरुस्त करण्यासाठी तात्काळ काम हाती घेण्याच्या सूचनाही नगरपालिकेला देण्यात आल्या. पंचगंगेतील दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.