breaking-newsराष्ट्रिय

इंजिन नसलेली ‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ आजपासून ट्रॅकवर, काय आहे खासियत?

‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ असं म्हटलं जात असलेली ‘ट्रेन १८’ही आजपासून परीक्षणासाठी रेल्वे रुळावर उतरणार आहे. भारतातील पहिली इंजिन नसलेली ही ट्रेन रुळावर परीक्षणासाठी येणार आहे. आजपासून तीन ते चार दिवस या ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे, त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल. चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये १८ महिन्यांमध्ये ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तीस वर्षांपासून भारतीयांच्या सेवेत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसची जागा ही ट्रेन घेणार आहे. २२० किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. ट्रेनमधील आसनं ३६० अंशामध्ये कशीही फिरवता येतील.

या ट्रेनमध्ये वाय-फाय, जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर या ट्रेनची निर्मीती करण्यात आली आहे. शताब्दीची जागा घेणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १० ते १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

इंजिन नसल्यामुळे ट्रेनच्या पहिल्या डब्ब्यातच ड्रायव्हिंग सिस्टीमची व्यवस्था आहे. या ट्रेनच्या मध्ये २ एक्झिक्युटीव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील, तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील अशी माहिती आयसीएफचे महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी दिली आहे. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button