आसिया आंद्रबीचा जामीन हायकोर्टाकडून रद्द

- दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांकडून सादर
श्रीनगर – जम्मू कश्मीरमधील दुख्तरन ए मिलात या बंदी घातलेल्या संघटनेची प्रमुख आसिया आंद्रबी आणि अन्य चौघा जणांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला. जामीन मंजूर करताना सत्र न्यायालयाने चुकीचा विवेक वापरून या सर्वांना जामीन मंजूर केला होता, अशी टिप्पणी करून जम्मू काश्मीरच्या विभागीय खंडपिठाचे प्रभारी न्यायाधीश न्या. आलोक आराधे आणि ब्न्या. एम.के. हानजुरा यांनी अंतनागच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेला जामीन रद्द ठरवला.
आंद्रबी आणि तिच्या चार सहकाऱ्यांवर दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये खटले सुरू आहेत. या सर्वांना अनंतनाग पोलिसांनी एप्रिल महिन्यात अटक केली होती. दक्षिण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करणे आणि दगडफेक करण्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला होता. सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतरही पोलिसांनी आंद्रबीची सुटका केली नाही आणि अन्य प्रकरणात पुन्हा अटक केली. दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णयाला विधी विभागाच्या माध्यमातून आव्हान दिले गेले.
पोलिसांकडून आंद्रबीच्या जामिनाला आव्हान याचिकेबरोबर तपास अहवाल आणि केस डायरीही दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने जामीन रद्द ठरवला. जम्मू इकाश्मीरचे पोलिस महानिरीक्षक म्हणून स्वयम प्रकाश पानी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभाजनवाद्यांविरोधातील खटल्यांना वेग देण्यात आला. त्याबरोबर आंद्रबी सातत्याने दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचे मोबाईलद्वारे स्पष्ट झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले गेले. जामीन रद्द केल्याच्या निर्णयानंतर पोलिसांनी आज न्यायालयाच्या परवानगीने आंद्रबीच्या घरी आणि अन्य काही ठिकाणी छापेही घातले आहेत.