आशियाई चॅम्पियनशिप: साक्षी मलिक, विनेशला रौप्य

नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी रौप्य पदकावर नाव कोरले.
साक्षी मलिक आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंना आपल्या वजनी गटातील अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रिओ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती जपानची रिसाको कवाई हिने ६० किलो वजनी गटात साक्षी मलिकचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षी पहिल्यांदाच ६० किलो वजनी गटात खेळत होती. याआधी ती ५८ किलो वजनी गटात खेळत होती.
रिओ ऑलिम्पिकमध्ये जखमी झालेल्या विनेश फोगटचे आश्वासक पुनरागमन झाले. विनेश फोगटला ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या नांजो सेएकडून ८-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीतील पराभवामुळे विनेशला आपली नाराजी लपवता आली नसली तरी तिने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तर, ४८ किलो वजनी गटात रितू फोगटला कांस्य पदक मिळाले. चीनची यानान सून जखमी झाल्यामुळे तिने सामन्यातून माघार घेतली.