आरटीईची दुसरी फेरी ; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी

पिंपरी – आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहत असणा-या पालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) दुसरी फेरी सुरू होणार आहे. शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज न भरलेल्या पालकांना नव्याने अर्ज करता येणार आहे. शाळा पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याने पालकांची काळजी वाढली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातील आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतरही अनेक विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे संबंधितांना दुसºया फेरीची प्रतीक्षा होती. अनेक दिवसांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाºया मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.
शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. दुर्बल गटामध्ये ज्या पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे. अशा पालकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून इतर रिक्त जागांसाठी सुधारित अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वंचित गटामध्ये भटक्या जमाती ब, क, ड इतर मागासवर्ग व एचआयव्ही बाधित बालकांचाही समावेश करण्यात आला आहे.
तसेच एचआयव्ही बाधित बालकांना प्रवेशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा समकक्ष अधिकाºयांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. नोंदणी सुरू झाल्यानंतर काही शाळांनी परताव्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल विविध कारणांनी लांबल्यामुळे पहिल्या फेरीत आरटीईचे प्रवेश रखडले. त्यानंतर न्यायालयाने शाळांना प्रवेश देणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला. शाळांनी आरटीईचे प्रवेश करून घेतले. आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून फक्त एकच फेरी पूर्ण झाली आहे.