आयपीएल सट्टेबाजी प्रकरण; सोनूच्या डायरीत सेलेब्रिटीसह पाकच्या नेत्याची नावे

मुंबई : आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा म्होरक्या सोनू जालान उर्फ सोनू मालाडची डायरी पोलिसांनी हस्तगत केली असून त्यात अनेक सेलिब्रिटी तसेच बड्या हस्तींची नावे आढळली आहेत. मुख्य म्हणजे या डायरीत पाकिस्तानातील एका राजकीय नेत्याचेही नाव असून पोलिसांनी त्याबाबत कसून तपास सुरू केला आहे.
सोनू मालाडने दिलेला जबाब आणि त्याच्या डायरीतील माहितीची जुळवाजुळव केली जात असून त्यातून अनेक बड्या हस्तींनी आयपीएल सामने तसेच खेळाडूंवर सट्टा लावल्याचे उघड होण्याची शक्यता असल्याचे ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
अभिनेता अरबाज खानने सोनूच्या माध्यमातून आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला होता. सोनूसोबत ज्युनियर कलकत्ता नावाचा बुकीही तेव्हा रॅकेटमध्ये होता. सोनू आणि अरबाज यांच्यात तेव्हा मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला. त्याचवेळी अरबाजला ब्लॅकमेल करूनही मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले. जर पैसे पुरवले नाहीस तर तुझा सट्टेबाजीचा नाद उघड करू, अशी धमकीही अरबाजला देण्यात आली होती, अशी माहिती तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.