breaking-newsपुणे

“आयएमडी’ तयार करतेय पाण्याचा शास्त्रोक्‍त अहवाल

सन 1901 पासूनची लोकसंख्या, उपलब्ध पाणी उपलब्धतेचा आलेख

पुणे – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी किती उपलब्ध होऊ शकते, तसेच पावसाचे पाणी किती मिळू शकते त्यावरुन संबंधित भागात कोणती पिके घेणे आवश्‍यक आहे, याचा सर्वांगीण अभ्यास करणारा अहवाल भारतीय हवामान शास्त्र विभाग अर्थात “आयएमडी’ तयार करत आहे. या अहवालामुळे राज्यातील उपलब्ध पाण्याची माहिती मिळणे शक्‍य होणार आहे.

“आयएमडी’चा पुणे विभाग हा अभ्यास करत आहे. सध्या हे काम विभागीयस्तरावर आहे. त्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असे विभाग पाडण्यात आले आहे. यानुसार संबंधित विभागातील 1901 पासूनची लोकसंख्या आणि उपलब्ध पाणी याचा आलेख मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये मान्सूनच्या काळात पडणारा पाऊस संबंधित शहरात मान्सून येण्याचा साधारण दिवस किंवा परतीच्या मान्सूनचा दिवस याचीसुद्धा नोंद आहे. याशिवाय मान्सनूच्या काळात याभागात साधारणत: किती दिवस पाऊस पडतो याचासुद्धा अभ्यास केला आहे.

सध्या हा अभ्यास विभागीयस्तरावर असला, तरी पुढील टप्यात तो जिल्हा पातळीवर तयार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर किती पाऊस पडतो, या पावसाद्वारे मिळणारे पाणी कशा प्रकारे साठविता येईल याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडतो. पावसाचे दिवससुद्धा जास्त असतात. त्यामुळे तेथे पाण्याची उपलब्ध जास्त आहे. त्यामानाने मराठवाड्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. आता नांदेड जिल्ह्यात पावसचे प्रमाण अधिक आहे. पण तेथे पाण्याची उपलब्धता मात्र कमी असते. त्यामुळे त्याभागात अनेकवेळा पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हे या अभ्यासामुळेच कळू शकणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे जास्त केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल.

भारतीय हवामान शास्त्र पुणे विभागाने असा छत्तीसगड राज्याचा परिपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो दिल्ली येथील हवामान खात्याच्या मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.त्यानंतर आता महाराष्ट्राचा अभ्यास अंतिम टप्यात आला आहे. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथे पाठविला जाणार आहे.
– डॉ. पी. के. नंदनकर, ज्येष्ठ वैज्ञानिक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button