आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला

मुंबई : आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड 2018 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये हरियाणातील पंचकुलाचा प्रणव गोयल हा देशात पहिला आला, तर महाराष्ट्रात मुंबईचा ऋषी अग्रवाल हा देशात आठवा, तर राज्यात पहिला आला आहे.
ऋषी अग्रवाल हा मुंबईच्या पेस इन्स्टिस्टूटचा विद्यार्थी आहे. देशातील आयआयटी, एनआयटी महाविद्यायांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. देशभरातून यावर्षी जवळपास एक लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
देशभरातून या परीक्षेला बसलेल्या एक लाख 55 हजार 158 विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 138 विद्यार्थी पास झाले आहेत. प्रथम आलेल्या प्रणव गोयलने 360 पैकी 337 गुण मिळवले. कोटा येथील साहिल जैन देशातून दुसरा आला असून दिल्लीच्या कलश शहाने तिसरा क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख पहिली आली, देशातून ती सहावी आली आहे. तिला 360 पैकी 318 गुण मिळाले आहेत.
या परीक्षेत एकूण 16 हजार 32 विद्यार्थी आणि 2076 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वसाधारण गटातील 8794, ओबीसी प्रवर्गातून 3140, अनुसूचित जातींमधून 4709 आणि अनुसूचित जमातींमधून 1495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.