आमचा पक्ष सत्तेवर आल्यास काश्मीर विलीन करून घेऊ

पीएमएल पक्षाचे प्रमुख शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
इस्लामाबाद – पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये आमचा पक्ष सत्तेवर आल्यास दोन्ही काश्मीरचे आम्ही विलीनीकरण घडवून आणू अशी दर्पोक्ती पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की पुर्व जर्मनी अणि पश्चिम जर्मनी यांचे जसे विलिनीकरण झाले तसेच दोन्ही काश्मीरचे आम्हीं विलीनीकरण करून दाखवू. एकीकृत काश्मीर हा पाकिस्तानचा भाग बनेल आणि तेथे शांतता आणि विकास साधला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर बोलताना दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या काश्मीर धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की भारत काश्मीरींना अमानवी वागणूक देत आहे. बर्लिनची भिंत पाडून जसे 3 ऑक्टोबर 1990 ला पुर्व आणि पश्चिम जर्मनीची विलिनीकरण झाले तसेच पाक व्याप्त काश्मीर आणि भारताच्या ताब्यातील काश्मीरचे विलिनीकरण करणे अशक्य नाही. काल एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी पाकिस्तानला भारताच्याही पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही सत्तेवर आल्यानंतर जर मी पाकिस्तानला भारताच्याही पुढे घेऊन गेलो नाहीं तर तुम्ही माझ नाव बदला अशी आव्हानाची भाषाहीं त्यांनी वापरली.
आम्ही असा पाकिस्तान घडवू की ते भारतीय वाघा बॉर्डर वर येतील आणि पाकिस्तानच आमचा मालक आहे अशी घोषण करतील अशी वायफळ बडबडही त्यांनी यावेळी केली. पकिस्तानला मलेशिया आणि तुर्कस्तान प्रमाणे समृद्ध करण्याचा आपला इरादा आहे त्यासाठी महाथीर महंमद आणि तुकीचे अध्यक्ष तय्यपी इरडोगन यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.