आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली – दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर बुधवारी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. नवी दिल्लीतील विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या सल्लागारांच्या भर्ती प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. याप्रकरणी सत्येंद्र जैन आणि एस के श्रीवास्तव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, आपच्या नेत्यांनी ही कारवाई असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास सत्येंद्र जैन यांच्या 8 राजनिवास मार्गावरील सरकारी निवासावर सीबीआयच्या 8 अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. पीडब्ल्यूडीमधील आर्किटेक्स्च्या भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याने सत्येंद्र जैन यांच्या घराची तपासणी केली. तसेच सत्येंद्र जैन यांच्यासह पीडब्ल्यूडीच्या अधिकारांच्या निवासस्थानासह 5 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईबाबत स्वःत सत्येंद्र जैन यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान काय करू इच्छित आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच आपच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारवर आरोप केले.
दरम्यान, सीबीआयने कालच (मंगळवारी) सत्येंद्र जैन यांची मुलगी सौम्या जैन यांच्या विरोधातील केस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सौम्या जैन यांची मोहल्ला क्लिनिकच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, याबाबत वाद निर्माण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. तसेच सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असून सीबीआय याचाही तपास करत आहे.