आदिवासी शिष्यवृत्तीच्या “साईट’चा वेग मंदच ! विद्यार्थी, पालक त्रस्त

नांदेड : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या आदिवासी (एसटी) विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. पाच एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आज 35-40 दिवस झाले तरी संकेत स्थळ अनियमितच असल्याने सत्र संपले तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार समाजातील प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणासाठी मागासलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळाल्या पाहिजे, शालेय पोषण आहार, मोफत पुस्तके, गणवेश, उपस्थिती भत्ता, देऊन विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती वाढवून त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण व्हावे हा शिक्षणाचा कायदा आहे. मात्र, आज अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना याचा पुरेपुर लाभच मिळत नाही. केंद्र सरकारची शिष्यवृत्ती असो की गुणवत्ता शिष्यवृत्ती असो, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुलींसाठी सुरू आहे. अल्पसंख्यांक समाजातील मुलांनाही शिष्यवृत्ती मिळते. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ होतोच असे नाही. शासनाने सध्या सर्व शिष्यवृत्या ऑनलाइन केल्या आहेत. बॅंकेत विद्यार्थ्यांचे खाते काढून त्याला आधार क्रमांक लिंक करावा लागत आहे. शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बॅंकखात्यात परस्पर जमा होत आहे.
मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे बॅंक खातेच नाही किंवा आधार क्रमांक नाही. अनेक जण ऑनलाईन शिष्यवृत्तीचा अर्जच भरत नाहीत. शाळेत शिक्षक माहिती सांगतात मात्र, ग्रामीण भागातील अज्ञानी पालक बॅंकेचा खाते नंबर, आधार नंबर, शिष्यवृत्तीसाठी लागणारे कागदपत्रच देत नाही. परिणामी ते विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. ज्यांनी सर्व कागदपत्रे दिली व ऑनलाइन अर्ज भरायला गेले तर साईट बंद असते किंवा अनियमित असते. त्यात अनेक त्रुटी असतात. शिक्षक, पालक, मुख्याध्यापक यामुळे त्रस्त झाले आहेत.
संकेतस्थळाला गतीच नाही
सुवर्ण महोत्सवी अदिवासी शिष्यवृत्ती संकेतस्थळ हे मागील वर्षापेक्षाही कासवगतीने चालत आहे. संकेतस्थळ लॉगीन करण्यासाठी मोठा त्रास देत असून लॉगीन न होता. “अनएक्सपटेड ऍप्लीकेशन एन्टर ‘ हा रिमार्क दाखवते. कसेतरी लॉगिन झाल्यास प्रत्येक अर्ज भरून झाल्यावर संकेतस्थळ पोर्टल लॉगआऊट होवून तोच रिमार्क दाखविते. चार-पाच वेळा अर्ज भरून सुद्धा अर्ज जमा होत नाही. प्रत्येक अर्ज भरण्याकरिता पुन्हा-पुन्हा नव्याने लॉगइन करावे लागत आहे. सदर प्रक्रिया ही फारच किचकट आणि कंटाळवाणी तसेच वेळ वाया घालविणारी असून, खर्चिक आहे. संकेतस्थळ दिवसा व्यवस्थित काम करणे तर सोडूनच द्या, पण रात्रीही व्यवस्थित चालत नाही.
अर्ज भरून झाल्यावर प्रिंट मध्ये अर्ज भरत असताना अनिवार्य निवडलेल्या डाक्युमेंट समोर राईट चिन्ह न येता रॉंग चिन्ह येते. “पीडीएफ’ फाईल तयार होत नाही. अशा अनेक त्रुटी या संकेत स्थळावर आहेत. यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, त्रस्त झाले आहेत.
नुतनीकरणातही विद्यार्थ्यांना अडचणी
मागील वर्षी शैक्षणिक सत्र 2015 -16 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले होते, त्या विद्यार्थ्यांचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये नुतनीकरण करतानासुद्धा वरील सर्व समस्या जाणवतात. त्यामुळे सत्र संपले तरी आदिवासी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरल्या गेले नाहीत. परिणामी हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित तर राहणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.