आण्विक निःशस्त्रीकरणाच्या बदल्यात अमेरिकेकडून उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी

सिंगापूर – उत्तर कोरियाने जर संपूर्ण, सत्य आणि बदल न होणाऱ्या आण्विक निःशस्त्रीकरणाचा पर्याय स्वीकारल्यास अमेरिकेकडून उत्तर कोरियाला अद्वितीय अशी सुरक्षेची हमी देऊ केली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये उद्या (मंगळवारी) होणाऱ्या ऐतिहासिक परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेमुळे आशिया पॅसिफिक भागातील भूराजकीय नकाशाच बदलून जाऊ शकतो. या बहुप्रतिक्षित परिषदेच्या पार्श्वभुमीवर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या आण्वस्त्रांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर कोरियाकडून एक दशकभरापेक्षा अधिक कालावधी ही अण्वस्त्रे विकसित केली जात आहेत.
ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात बऱ्याच काळापासून शाब्दिक शेरेबाजी होत होती. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीकाही केली होती. त्यामध्ये धमक्या आणि एकमेकांचा थेट अनादर करणारी प्रक्षोभक वक्तव्येही होती. त्यामुळेच या परिषदेतील घडामोडींकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या परिषदेपूर्वीच त्याचा निष्कर्श काढला जाऊ शकेल, असे सूचक वक्तव्य अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केले आहे.
या परिषदेत सकारात्मक वातावरण रहावे, यासाठी अमेरिकेच्यावतीने संपूर्ण आण्विक निःशस्त्रीकरणाच्या बदल्यात अद्वितीय सुरक्षेच्या हमीचा प्रस्ताव तयार ठेवला आहे. आण्विक निःशस्त्रीकरणाने आपली हानी होणार नाही याची उत्तर कोरियाला खात्री पटावी, असाच अमेरिकेचा प्रयत्न असल्याचेही पॉम्पेओ यांनी सांगितले.
कोरियन युद्धानंतरच्या शांतता करारावरही चर्चा अपेक्षित
1950-53 या कालावधीतील कोरिया युद्धानंतर उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये शांतता करार झाला होता. मात्र सध्या उत्तर आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश शांतता राखण्याऐवजी एकमेकांविरोधात संघर्षासाठी उभे ठाकले आहेत. कोरिया युद्धानंतरच्या शांतता कराराबाबतही या परिषदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिका आणि उत्तर कोरियातील संबंधांबाबतही चर्चा अपेक्षित आहे. कोरियन द्विपकल्पामध्ये दीर्घकाळ शांतता राखण्याच्यादृष्टीने कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यावर चर्चेत भर असेल, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.