आंतरराष्टीय

आज राष्ट्रकुल स्पर्धेचे बिगुल वाजणार

गोल्ड कोस्ट (वृत्तसंस्था) ः टोकियोत २०२०मध्ये होणारे ऑलिम्पिक, त्याआधी, यावर्षी होत असलेली आशियाई क्रीडा स्पर्धा यादिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी पहिले पाऊल पडते आहे ते गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या माध्यमातून. ४ ते १५ एप्रिल या कालावधीत सुमारे १८ क्रीडा प्रकारांसाठी ७१ देशांचे खेळाडू या चार वर्षांनी आयोजित सोहळ्यात सहभागी होत आहेत. ग्लासगोतल्या राष्ट्रकुल स्पर्धेतले अपयश धुवून काढत भारतीय खेळाडूंना दिल्लीतल्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती करायची आहे.

भारताच्या २१८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू राहत असलेल्या ठिकाणी सापडलेल्या सुयांमुळे भारतीय खेळाडूंवर संशयाची सुई होती. मात्र, हा वाद आता मागे पडला असून, आजपासून (बुधवार) सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला संपूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यास भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. भारताला यावेळी २५ ते ३० सुवर्णपदकांची अपेक्षा आहे.

भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे ती नेमबाजांकडून. नुकत्याच झालेल्या सीनियर आणि ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. हीना सिद्धू ही २५ मीटर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सहभागी होत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके मिळवली होती. १६ वर्षीय मनू भाकरच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. जितू रायला सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. अॅथलेटिक्समध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. गेल्या वर्षीच्या तीन पदकांपेक्षा या वेळी अॅथलेटिक्स चांगली चमक दाखवतील, असा विश्वास भारताकडून व्यक्त करण्यात आला आहे. यात सुवर्णपदकाची अपेक्षा आहे, ती २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राकडून. बॅडमिंटनमध्ये भारताची भिस्त पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांच्यावर असणार आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, सरीता देवी, विकास कृष्णन हे भारताला निश्चित पदक मिळवून देतील, अशी त्यांची तयारी झाली आहे. कुस्तीत भारताच्या पथकात सुशीलकुमार, साक्षी मलिक, विनेश फोगट अशी मोठी नावे आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूकडून (४८ किलो) सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्याव्यतिरिक्त हॉकी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस अशा खेळांकडूनही भारताला अपेक्षा आहेत. भारताला प्रमुख आव्हान असेल ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कॅनडा, न्यूझीलंड, द. आफ्रिका, स्कॉटलंडच्या खेळाडूंचे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button