आजपासून बीफार्मसी व डीफार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे – वैद्यकीय शाखेत औषध क्षेत्रात अभ्यास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून बीफार्मसी व डीफार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्य सामाईक परीक्षा मंडळातर्फे यासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 19 जूनपर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहे.
विज्ञान शाखेतून काही ठाराविक विषय घेऊन इयत्ता बारावी पूर्ण केलेल्या व कमीत कमी 50 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज भरता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र तसेच गणित आदी विषयांसहित 2018 ची सीईटी दिली असेल व नीटची परीक्षा दिली असेल त्यांनाही यासाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी www.mahacet.org/ph2018 या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे व शुल्काची माहिती संकेतस्थळावर दिली जाईल. 23 जून रोजी याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.