आई गेली देवाघरी; मृतदेहाशेजारी बसून बाळ पितेय दूध…

भोपाळः आई देवाघरी गेली आहे… मृतदेहाशेजारी बसून तिचे एक वर्षाचे बाळ दूध पित अूसन, तिला उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. संबंधित दृश्य पाहून अनेकांचे हृदय हेलावले आहे.
मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात रेल्वे स्टेशनजवळ हे दृश्य अनेकांनी पाहिले असून, काहींनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एक पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह रेल्वेगेट व मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मल्ल्या यांच्या निवासस्थानाजवळ आढळून आला आहे. या मातेच्या मृतदेहशेजारी तिचा 14 महिन्यांचा बाळ दिसत आहे. रडून-रडून दमलेला मुलगा आपल्या आईला उठविण्याचा प्रयत्न करत आहे. भुकेने व्याकूळ होऊन तो दूध पित असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. चिमुकल्याला आपली आई जग सोडून गेली आहे, याची कल्पनाही नाही. संबंधित दृष्य पाहून अनेकांचे हृदय हेलावत आहे.
रेल्वेने धडक दिल्यामुळे अथवा एखाद्या वाहनाने उडविल्यामुळे महिलेचा डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाला असावा. परंतु, अपघातावेळी या मातेने बाळाला कुशीत जाम धरल्यामुळे त्याचा जीव वाचला असेल. शिवाय, अपघातानंतर काही वेळ माता जिवंत असावी, यावेळी तिने बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दामोह येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह उचलल्यानंतर बाळाचे रडणे ऐकून अधिकारीही हेलावले. घटनास्थळी महिलेची पर्स मिळाली आहे. तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधिरी विद्यार्थी म्हणाले, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झाला होतो. संबंधित दृष्य पाहून हृदय हेलावले. मृत्युमुखी पडलेल्या आई शेजारी बसलेले बाळ आईला उठविण्याबरोबरच दूध पिण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. मृतदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर दहा रुपयांचे शुल्क मागण्यात आले. दहा रुपये दिल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला. बाळाला बाल भवनमध्ये दाखल केले आहे. पुढील दोन दिवस या बाळाच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल. दोन दिवसात कोणी पुढे आले नाही तर कायदेशीरबाबी पुर्ण करून त्याची जबाबदारी घेतली जाईल.