आंतरजातीय विवाह केल्याने नवविवाहित दाम्पत्याला पेटवून दिलं

पुणे – आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून नवविवाहित दाम्पत्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरच्या निघोजमध्ये घडला. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला. ती दोन महिन्यांची गर्भवती होती.
या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मामा आणि काकांना अटक केली आहे. तर तिचे वडील फरार आहेत. या प्रकारात मुलीचा पतीदेखील भाजला असून त्याच्यावर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुक्मिणी आणि मंगेश रणसिंग यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र हा आंतरजातीय विवाह असल्यानं रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यामुळेच रुक्मिणीच्या कुटुंबानं तिच्यासह मंगेशलादेखील जबर मारहाण केली. मात्र तरीही रुक्मिणी मंगेशसोबतच राहण्याबद्दल ठाम होती. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबानं त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघांना घरात कोंडून ठेवण्यात आलं. आगीत होरपळलेल्या दोघांना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ती दोन महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणी अहमदनगरच्या पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रुक्मिणीच्या मामा आणि काकांना अटक केली आहे. तर तिचे वडील फरार आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.