अहंकाराचा प्रश्नच नाही : भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे

नवी दिल्ली: ‘मी कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे याचा अर्थ असा नाही की वन-डे क्रिकेट स्पर्धेत १२ व्या खेळाडूची भूमिका बजावू नये. ज्या क्षणी तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करता तेव्हापासून तुम्हाला जी भूमिका किंवा काम दिले जाईल ते तुम्हाला केलेच पाहिजे. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांतन मी जेव्हा मैदानात ड्रिंक्स घेऊन जात होतो तेव्हा माझ्या मनाला अहंकार शिवलादेखील नाही किंवा असुरक्षतही वाटले नाही. एक व्यक्ती म्हणून मी असाच आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने दिली.
मार्च महिन्यात धरमशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अजिंक्य भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत त्याला १२ वा खेळाडू म्हणून मैदानात येऊन पाणी देण्याचे काम करावे लागले. याबाबत मनात अहंकार आला नाही का, असे विचारता त्याने अहंकारा मनाला शिवलाही नाही असे उत्तर दिले. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात पाच वन-डे क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत अजिंक्यने एक शतक, तीन अर्धशतके आणि ६७.२० च्या सरासरीने ३३६ धावा केल्या.
तो म्हणाला, ‘वेस्ट इंडिज दौऱ्यात फलंदाजीत मी सातत्य दाखवू शकलो त्यामुळे हा दौरा माझ्यासाठी विशेष होता. माझ्या वन-डे कारकिर्दीच्या दृष्टिने हा दौरा खूपच महत्त्वाचा ठरला. जवळजवळ प्रत्येक सामन्यात मी धावा केल्या हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे. माझ्या फलंदाजीला एक वेगळाच आयाम मी देऊ शकलो. वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करण्याची संधी मला मिळाली. ’