असहिणूतेमुळे देशाची प्रतिमा नष्ट होईल – मुखर्जी

- संघाच्या व्यासपीठावरून माजी राष्ट्रपती मुखर्जी यांचे प्रतिपादन
नागपूर – “धर्म, शिकवण अथवा असहिष्णूतेच्या आधारे भारताची व्याख्या करण्याचा प्रयत्न झालयस देशाचे अस्तित्व लोप पावेल.’ अशा शब्दात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून आणि स्वतःच्या कन्येकडूनही जोरदार टीका झाल्यानंतरही मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला उपस्थित राहिले होते. याप्रसंगी बोलताना मुखर्जी यांनी असहिष्णूतेच्या मुद्दयावर विशेष भर दिला. सार्वत्रिकता, एकरुपता आणि सहअस्तित्वातून निर्माण झालेली राष्ट्रीय ओळख आणि भारतीय राष्ट्रीयत्व असहिष्णूतेमुळे सौम्य होईल. सहिष्णूता आणि वैविध्यतेबाबतचा आदर ही भारताची बलस्थाने आहेत, असे ते म्हणाले.
आपल्या “भारत’ देशासंदर्भातील राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीबाबतच्या आपल्या विचारांना मांडण्यासाठी आपण येथे आलो आहोत, अशा शब्दांनी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपल्या सार्वजनिक वर्तनातून सर्व प्रकारचे भय आणि हिंसाचाराला दूर केले पाहिजे, असे ते म्हणाले.
संघाच्या व्यासपीठावरून ते काय बोलतात याबाबत सर्वच स्तरांमधून उत्सुकता व्यक्त होत होती. संघाच्या प्रथेला छेद देऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणानंतर मुखर्जी यांचे इंग्रजीतून भाषण झाले. मुखर्जी संघ समारंभामध्ये सहभागी झाले, त्यामुळे निर्माण झालेला वाद निरर्थक आहे. संघासाठी कोणीही तिऱ्हाईत नाही, असे भागवत म्हणाले. संघाला नेहमीच हिंदू उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून संबोधले जाते. संघ स्वतःला राजकीय किंवा सांस्कृतिक संघटनेऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवादी संघटना म्हणूनच ओळखतो, असेही ते म्हणाले.
संघाच्या कर्यक्रमामध्ये सहभागाच्या प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर कॉंग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका होत होती. मात्र संघाच्या व्यासपीठावर आल्यावर मुखर्जी जसे आहेत, तसेच राहतील आणि संघही जसा आहे, तसाच राहिल. ;लोकांमध्ये मतभिन्नता असू शकते. मात्र ते सर्वजण भारतमातेची लेकरे आहेत. प्रतिष्ठित मान्यवरांना निमंत्रित करणे ही संघाची प्रथा आहे. त्यानुसार मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले.
संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींचे पुत्र सुनिल शास्त्री आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदू बोस हे आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.