breaking-newsराष्ट्रिय

‘अयोध्येबद्दल दिवाळीत गुड न्यूज देणार’, भाजपा नेत्याचं सूचक वक्तव्य

अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर टीका होत असताना उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अयोध्येबद्दल दिवाळीत चांगली बातमी ऐकायला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे.

‘योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असण्यासोबतच एक मोठे संत आहेत. नक्कीच त्यांनी अयोध्येसाठी धोरण आखलं असणार. दिवाळी येऊ द्या….आनंदाची बातमी मिळण्याची वाट पहा. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच ही योजना समोर आली तर योग्य होईल’, असं महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आपण एका चांगली बातमी घेऊन जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच महेंद्रनाथ पांडे यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. अयोध्येची सुनावणी जानेवारी महिन्यात होण्यासंबंधी विचारलं असता योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा अन्यायामुळे न्याय मिळण्यास उशीर होतो अशी प्रतिक्रिया दिली होती.

राम मंदिरावरून देशात विविध चर्चा सुरु आहेत. राम मंदिर प्रश्नी सुप्रीम कोर्ट काय फैसला देणार ते जानेवारीत स्पष्ट होऊ शकते. अशात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची योजना पुढे आणली आहे. या पुतळ्यात श्रीरामाचे रुप हे राजाच्या स्वरूपात दिसणार आहे. हा पुतळा धनुर्धारी असेल असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारण्याची मागणी होते आहे. त्यापाठोपाठ अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी योजना योगी आदित्यनाथ घेऊन आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा पुतळा निर्माण करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनाच रामाच्या पुतळ्याचे काम देण्यात आले येईल अशीही माहिती समोर आली. एवढंच नाही तर रामाच्या पुतळ्याचे एक मॉडेल (छोटी प्रतिकृती) हे योगी आदित्यनाथ यांना राम सुतार यांनी दाखवले असून ते त्यांना पसंत पडले आहे असेही समजते आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही योजना योगी आदित्यनाथ यांनी आणली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button