अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची योगी आदित्यनाथ यांची योजना

राम मंदिरावरून देशात विविध चर्चा सुरु आहेत. राम मंदिर प्रश्नी सुप्रीम कोर्ट काय फैसला देणार ते जानेवारीत स्पष्ट होऊ शकते. अशात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची योजना पुढे आणली आहे. या पुतळ्यात श्रीरामाचे रुप हे राजाच्या स्वरूपात दिसणार आहे. हा पुतळा धनुर्धारी असेल असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारण्याची मागणी होते आहे. त्यापाठोपाठ अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी योजना योगी आदित्यनाथ घेऊन आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा पुतळा निर्माण करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनाच रामाच्या पुतळ्याचे काम देण्यात आले येईल अशीही माहिती समोर आली. एवढंच नाही तर रामाच्या पुतळ्याचे एक मॉडेल (छोटी प्रतिकृती) हे योगी आदित्यनाथ यांना राम सुतार यांनी दाखवले असून ते त्यांना पसंत पडले आहे असेही समजते आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही योजना योगी आदित्यनाथ यांनी आणली आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे
काय आहे ही योजना?
अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. सीएसआरद्वारे या पुतळ्यासाठी निधी गोळा केला जाईल. श्रीरामाच्या पुतळ्यासह या ठिकाणी नवी अयोध्या वसवण्याचाही योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. त्याचबरोबर सेव्हन डी तंत्रातील रामलीला, रामकथा सांगणारी एक गॅलरी, म्युझिकल फाऊंटन हेदेखील या योजनेचाच एक भाग आहेत. सुप्रीम कोर्टाने राम मंदिरासंदर्भातली सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वाढत्या दबावातून योगी आदित्यनाथ यांनी हा मास्टरस्ट्रोक लगावल्याची चर्चा रंगली आहे.