अमित शहा आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार!

मुंबई : देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे भाजपाला आता जुन्या मित्रांची आठवण आली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज (बुधवारी) सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एनडीए’मधील घटक पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही सोबत ठेवण्याची भूमिका घेतली असून, त्यानुसार बोलणी करण्याचे काम शहा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते बुधवारी मुंबईत येत आहेत. शहा नेमकी कशाप्रकारची बोलणी करणार आहेत, याचा अंदाजा शिवसेना नेतृत्वाला नसला तरी लोकसभेतील युतीबाबतची बोलणी असल्याचा अंदाज शहा यांच्याकडून देण्यात आल्याचे कळते. दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांची गरज भासणार असल्याचा अंदाज शिवसेनेला आहे. मात्र राज्यात लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचे सेनेला अधिक गांभीर्य असल्याने युतीबाबतच्या प्राथमिक चर्चेत विधानसभेतील युती आणि जागावाटपाबाबतही प्राथमिक चर्चा करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. शिवसेनेला केंद्रात आणखी किती कॅबिनेट पदे देणार यात जराही स्वारस्य नाही.