अमली पदार्थ विक्रेत्यांना मोक्का

पोलिसांच्या कारवाईने उत्पादक-वितरक साखळीला हादरा
अमली पदार्थ उत्पादक ते विक्रेत्यांपर्यंतच्या साखळीला हादरा देणारी कारवाई डोंगरी पोलिसांनी केली. पोलिसांनी चार परदेशी अमली पदार्थ विक्रेत्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) अटक केली. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडीबंदर परिसरात नायजेरिअन अमली पदार्थ विक्रेत्यांचा अड्डा होता. या अड्डय़ावरून कोकेन, एमडी या घातक अमली पदार्थाची विक्री होत होती. ती रोखण्यासाठी डोंगरी पोलिसांसह गुन्हे शाखा, अमली पदार्थविरोधी पथकाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी नायजेरियन विक्रेत्यांनी पोलीस पथकावर दगडफेक केली, हल्ला केला. एका प्रसंगी गोळीबारही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर साहाय्यक आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी या तस्करांवर ‘मोक्का’अन्वये कारवाईसाठी पुढाकार घेतला.
फेब्रुवारी महिन्यात तीन नायजेरियन तरुणांना एमडी विक्री करताना डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका साथीदारालाही अटक करण्यात आली. यापैकी इक्यू इमॅन्युअल हा या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. त्याच्याविरोधात अलीकडच्या काळात अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल होते. तसेच त्या गुन्ह्य़ात आरोपपत्रही दाखल होते. ही पार्श्वभूमी ‘मोक्का’न्वये कारवाई करण्यासाठी पुरेशी असल्याचे लक्षात येताच धर्माधिकारी यांनी वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठवला. त्यास मंजुरी मिळताच या चारही आरोपींविरोधात ‘मोक्का’न्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना ‘मोक्का’ न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘अमली पदार्थविरोधी लढय़ात जनजागृतीच्या जोडीला कठोर कारवाईचीही गरज आहे. वर्षभरात डोंगरी आणि जेजे मार्ग पोलिसांनी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ६२८ जणांना अटक केली. येथील वस्त्या, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये पथनाटय़े, फ्लॅश मॉब, परिसंवादांद्वारेजनजागृतीही करण्यात आली,’ असे साहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.
‘मोक्का’चे महत्त्व
‘मोक्का’न्वये दाखल गुन्ह्य़ात आरोपीला जामीन मिळवणे अशक्य ठरते. खटल्याच्या निकालापर्यंत आरोपींना कारागृहात बंदिस्त राहावे लागते. दोष सिद्ध झाल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद जास्त असते. विविध कारणांनी चकमकी बंद झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी मोक्काचे अस्त्र उगारून संघटित गुन्हेगारी मोडून काढली. त्यामुळे या कारवाईचा धसका गुन्हेगारांनी घेतला आहे. सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढल्यानंतर ठाणे पोलिसांनी पहिल्यांदा ‘मोक्का’न्वये कारवाई केली. त्यापाठोपाठ मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरांविरोधात ‘मोक्का’न्वये गुन्हे दाखल केले. त्याचा धसका सोनसाखळी चोरांनी घेतला. त्याचप्रमाणे अमली पदार्थ तस्करांनाही या कारवाईने हादरा बसेल, असा विश्वास डोंगरी पोलीस व्यक्त करत आहेत.