अभिनेत्री सुरवीन चावलासह तिघांना फसवणूकप्रकरणी अटक
चंदीगड – बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला, तिचा पती अक्षय ठक्कर आणि भाऊ मनविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 40 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंजाबमधील व्यावसायिक सत्यपाल गुप्ता आणि त्यांचा मुलगा पंकज गुप्ताने पोलिसात ही तक्रार दिली होती. सुरवीन चावला, तिचा पती आणि भावाने गुप्ता यांच्याकडून सिनेमासाठी 40 लाख रुपये घेतले आणि हा पैसा दुप्पट करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आजपर्यंत एक रुपयाही परत मिळालेला नाही, अशी तक्रार गुप्ता या बाप-लेकांनी पोलिसात दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
पंकज गुप्ता यांची सुरवीनच्या भावासोबत ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत मनविंदर सिंहने त्यांच्याकडून “नील बट्टे सन्नाटा’ या चित्रपटासाठी 50 लाखांची गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र काही तांत्रिक कारणास्तव केवळ 40 लाख रुपयेच ट्रान्सफर झाले. यासाठी सुरवीन पंकज गुप्ता यांना तीन वेळा भेटली होती.
सुरवीनने चित्रपट रिलीज झाल्यानंतर सहा महिन्यात 70 लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात, चित्रपट प्रदर्शित होऊन चांगला व्यवसायही केला. त्यानंतर गुप्ता यांनी सुरवीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काहीही प्रतिसाद देण्यात आला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.