…अन् हेलिकॉप्टरमधून नवरदेव पोहोचले लग्नमांडवात, चर्चेला उधाण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाडेकर आणि देवकर यांच्या विवाहाची पिंपरी-चिंचवड शहरासह मुळशी आणि मावळ परिसरात चर्चा आहे. त्यांचा विवाह बुधवारी हिंजवडी मुळशी परिसरात धुमधडाक्यात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरदेव चक्क हेलिकॉप्टरने लग्नमांडवात पोहोचला. अशोक यांनी मावळ डोणे गाव येथून विवाहस्थळापर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास केला. एका शेतकरी कुटुंबातील अशोक यांनी सर्वत्र चर्चा घडवून आणली आहे.
मावळमधील डोणे गाव येथील नवरदेव अशोक बबनराव वाडेकर यांचा विवाह मुळशी तालुक्यातील पूजा देवकर यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथे होता. डोणेगावामध्ये अशोक यांची बँडबाजा आणि तुतारीच्या सुरात वाजत गाजत वरात काढण्यात आली. घरापासून हेलिकॉप्टरच्या ठिकणी अशोक रवाना झाले, गावात हेलिकॉप्टर येणार असल्याचे गावकऱ्यांना माहीत होते. त्यांनी हे सर्व पाहण्यासाठी गर्दी केली होती. नवरदेव अशोक यांच्या अवतीभोवती अंगरक्षकांनी वेढा घातलेला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास डोणेगाव मध्ये हेलिकॉप्टर दाखल झाले.
अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसून अशोक हे विवाहस्थळी निघाले, काही मिनिटांत हिंजवडी येथील विवाहस्थळी ते दाखल झाले. तब्बल ७५ हजार रुपये प्रति तास या दराने भाडेतत्वावर हे हेलिकॉप्टर घेण्यात आले होते. दरम्यान, अशोक यांचा विवाह पूजा यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथील शिवपार्वती लॉन्समध्ये पार पडला. यावेळी त्यांनी अग्नीला साक्ष मानून सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर मुळशी आणि मावळ त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा आहे. मावळ परिसरात नवरदेवाने हेलिकॉप्टरने विवाहस्थळी जाणे हा जणू ट्रेंडच निघालाय असच म्हणायला हरकत नाही.