…अन् भिकारी ‘जेठालाल, जेठालाल’ असं ओरडला!

मुंबई : ‘शूटिंगसाठी अहमदाबाद इथं गेलो असताना एका सिग्नलवर आमची गाडी थांबली. गाडी थांबताच तिथं असलेला एक भिकारी गाडीच्या जवळ आला. त्यानं मला पाहिलं आणि काही कळायच्या आताच तो ‘जेठालाल -जेठालाल’ असं ओरडत सुटला. माझ्यासाठी हे सारंच चकीत करणारं होतं.”
दिलीप जोशींनी सांगितलेला हा किस्सा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेच्या लोकप्रियतेचा जिवंत पुरावा आहे. छोट्या पडद्यावर नऊ वर्षे पूर्ण करणाऱ्या या मालिकेनं समाजातील सर्वच स्तरांतील लोकांवर गारुड केलं आहे. तब्बल ९ वर्षांच्या यशस्वी प्रवासाविषयी नुकताच दिलीप जोशी ऊर्फ ‘जेठालाल’ व मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एका अभिनेत्याची ताकद किती असू शकते, याचा अंदाज मला अहमदाबादच्या सिग्लवरील त्या प्रसंगातून आल्याचं ते म्हणाले. अर्थात, यामुळं कलाकार त्याची खरी ओळख गमावतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘मला आजही विश्वास बसत नाही की मालिकेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा कोणी याची कल्पनाही केली नसेल की ही मालिका इतका मोठा टप्पा पार करेल. लहान मुलांपासून अगदी आजी-आजोबा आमची मालिका आवडीनं पाहतात. आम्हाला भेटणारा प्रत्येकजण आमच्या अभिनयाचं कौतुक करतो. या मालिकेनं सर्वांच्याच मनात घर केलं आहे. यासाठी मी प्रेक्षकांचे आणि देवाचे आभार मानतो,’ अशा भावना दिलीप जोशी यांनी व्यक्त केल्या.
मालिकेच्या यशाबद्दल सांगताना मालिकेचे निर्माते असित मोदी देखील भावूक झाले. ही नऊ वर्ष नऊ दिवसांसारखी वाटतात. ही मालिका आणखी मजेशीर व्हावी यासाठी काही नवीन पात्रं यात आणणार असल्याचं मोदींनी सांगितलं.