breaking-newsमनोरंजन
अन्याया विरुद्धचा लढा

दाक्षिणात्य दिग्दर्शक पा रंजीत आणि सुपरस्टार रजनीकांत ही जोडी ‘कबाली’ नंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे ती ‘काला’च्या निमित्ताने. दमदार कथानक, उत्तम संवाद आणि नाना पाटेकर व रजनीकांत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या ‘काला’च्या जमेच्या बाजू आहेत. ‘कबाली’ कामगरांच्या प्रश्नाभोवती फिरत होता, तर ‘काला’ मेरी जमीन मेरा अधिकार असल्याचे सांगतो.
‘काला’ ही मुंबईच्या धारावी झोपडपट्टीच्या पुर्ननिर्माणाभोवती फिरणारी ही कथा आहे. पिवर भारत अभियानांतर्गत या झोपडपट्टीला मोडून हरीदादा उर्फ हरिदेव अभ्यंकर(नाना पाटेकर) मल्टीस्टेारींग इमारत उभारण्याचे स्वप्न पाहतो. साम, दाम, दंड, भेद वापरून हरिदादाला धारवी रिकामी करायची असते. मात्र, धारावीच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा काला करिकालन(रजनीकांत) याला हे मान्य नाही. कारण, इमारती बनल्यावर झोपडपट्टीतील गरीबांना काहीही मिळणार नाही, हा डाव त्याच्या लक्षात येतो. धारावीवर अधिराज्य गाजवणारा काला आणि पांढरपेशा पण सत्तेसाठी गलिच्छ डावपेच खेळणारा राजकारणी हरिदादा यांची ही जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. यात नेमका कुणाचा विजय होतो? हे जाणून घेण्यासाठी ‘काला’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.
पा. रणतिथ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. कथा, पटकथा आणि संवादावर बारकाई काम केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा अचूक पद्धतीने बांधलेली आहे. मुंबईच्या धर्तीवर कथा लिहीतांना अनेक बारीक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. झोपडपट्टी मोडून त्याजागी उंच दिमाखदार इमारती उभारण्यासाठी जागा मिळवण्याचे षडयंत्र अशा अनेक कथा आजवर येऊन गेल्या आहेत. मात्र, पा रणजिथने याच गाभ्याला अतिशय नव्या आणि रंजक साच्यात घालून पेश केले आहे.
कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर रजनीकांतची एन्ट्री अर्थातच साऊथ स्टाईल आहे. या वयातही रजनीकांत हिरोच आहे, हे त्यांच्या प्रत्येक प्रसंगात दिसून येते. निम्मा चित्रपट उरकल्यावर नानाची एन्ट्री आहे. त्यातही दिग्दर्शकाने वापरलेले कौशल्य दाद देण्याजोगे आहे. कोल्हापूरी चप्पल घालून चालणाऱ्या नानांचे फक्त पायच प्रवेशात दिसतात, अन त्यातही ते भाव खाऊन जातात. दोघे तगडे अभिनेते चित्रपटात आहेत. दोघांच्या व्यक्तीरेखाही दिग्दर्शकाने तेवढयाच ताकदीने रंगवल्या आहेत. कालाच्या पत्नीची भूमिका साकारलेली इश्वरी राव, तुफानीच्या भूमिकेतील अंजली पाटील, सिल्वाच्या भूमिकेतील दिपन यांनी दमदार काम केले. या सर्व राऊडी पात्रांमध्ये हुमा कुरेशीनेही आपली छाप पाडली आहे.
‘काला’ चित्रपट मुंबईच्या पार्श्वभूमीवर आहे. मात्र, यातील सर्व गाणी साऊथ स्टाईलची आहे. रॅपही यामध्ये आहे. सर्वच गाणी चांगली झाली आहेत. पा. रणजिथने वापरलेले कॅमेरा अँगल्स लक्ष वेधणारे आहेत. इतर तांत्रिक बाबी ही उच्च दर्जच्या आहेत, एकूण सांगायचे तर रजनीकांत आणि नानाची जुगलबंदी पाहण्यासाठी नक्कीच हा अन्याया विरुद्ध लढ़णारा ‘काला’ पहावा.
चित्रपट – काला
निर्माता – धनुष
दिग्दर्शक – पा रंजीत
संगीत – संतोष नारायण
कलाकार – रजनीकांत, नाना पाटेकर, हुमा कुरैशी, अंजली पाटील, ईश्वरी राव
रेटिंग -3.5