अनुभव नसल्याने अॅनिमल किपरचे सहा उमेदवार अपात्र

पिंपरी – निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयासाठी हंगामी सहा महिने मुदतीसाठी मानधन तत्वावर “अॅनिमल किपर’ पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेतील उमेदवारांकडे संर्पसंग्रह संस्थेत काम केल्याचे अनुभवन नसल्याने त्यांना अपात्र करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतू, यापुर्वी अॅनिमल किपरच्या भरतीत “वॉक-इन इंटरव्हीव्यू’ घेवून प्रशासनाने दिलेल्या नियम व अर्टीचा भंग करुन वशिलाबाजीने उमेदवारांच्या निवडी झाल्याने ती भरती आयुक्तांना रद्द केली होती. त्यानंतर नवीन राबविलेल्या भरतीतही त्यातील पाच उमेदवारांना घेतल्याने लोकशाही संस्थेच्या वतीने आयुक्तांकडे तक्रारी अर्ज करुन उमेदवारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात महापालिकेच्या वतीने हंगामी स्वरुपात सहा महिन्याच्या मुदतीत मानधन तत्त्वावर”अॅनिमल किपर’ पदाची प्रक्रिया राबविण्यात आली. “अॅनिमल किपर’ च्या सहा पदासाठी महापालिकेकडे 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवाराच्या “वॉक-इन इंटरव्हीव्यू’ सुरुवातीला 5 मे 2018 रोजी आयोजित केल्या होत्या. त्यावेळी “अॅनिमल किपर’ पदाच्या भरती प्रक्रियेत महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अर्टीचा भंग करण्यात आला आहे. तसेच, त्या नियमानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसून उमेदवारांना वशिलेबाजीने निवड झाल्याची तक्रारही लोकशाही संस्थेकडून आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यानुसार “अॅनिमल किपर’ पदाच्या भरती प्रक्रियेची प्रशासनाच्या चौकशी करण्यात आली.
दरम्यान, महापालिका प्रशासनातील तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत हंगामी “अॅनिमल किपर’ पदावरील उमेदवाराची निवड चुकीच्या पध्दतीने केल्याचे चौकशीत आढळून आले. त्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालयात अॅनिमल किपर अथवा सहा महिने अॅनिमल किपर पदावर काम केल्याचा अनुभव, संर्पसंग्रह असणा-या मान्यताप्राप्त शासकीय संस्थेमध्ये तांत्रिक पदावर काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र नसल्याने आणि एक उमेदवार मनपा सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने सर्व उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. या उमेदवारांमध्ये योगेश श्रीकृष्ण कांजवणे, राजेश मधुकर कांबळे, विनोद दिलीप देवकाते, अभिजित नेताजी पवार, गणेश गुलाब माने, विक्रम नंदकुमार भोसले, दिलीप भिमराव कामत यांना अॅनिमल किपर भरतीतून अपात्र ठरविले आहे.