अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

खराडी, वानवडीसह शहरात ठिकठिकाणी कारवाई
पुणे (प्रतिनिधी) – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागामार्फत एक, दोन, पाच आणि सहा या झोनमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 18 हजार 422 चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. या सर्व बांधकामांना नोटीस देण्यात आल्या होत्या.
झोन-1 मध्ये खराडी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन 6 हजार 625 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. झोन-5 मध्ये वानवडी, शिवरकर रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. येथे 9 हजार 787 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. याठिकाणी बहुतांश हॉटेलच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक अभियंता, इमारत निरीक्षक आणि घरपाडी अतिक्रमण विभागाकडील 20 बिगारी, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. गॅसकटर, जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. झोन-6 मध्ये बोपोडी बहिरट चाळ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येऊन सुमारे 810 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. याशिवाय औंध, वारजे कर्वेनगर, कोथरूड, घोलेरस्ता, बा. स. ढोले पाटील रस्ता, नगररस्ता, येरवडा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ, टिळक रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, हडपसर, धनकवडी, कोंढवा वानवडी येथील 71 स्टॉल, 652 हातगाडी, 303 पथारी, 58 सिलेंडर, 51 शेड, 16 व्यावसायिक वाहने, नादुरुस्त वाहने आणि इतर 213 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.